आमच्या बद्दल
- मुख्यपृष्ठ
- आमच्या बद्दल
मनोगत
मान्यवर,
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना सन १९१२ साली झाली असून, तब्बल ११३ व्या वर्षात बँकेचे पदार्पण झाले आहे. सन २०१२ साली बँकेला १०० वर्ष पूर्ण होत असतांनाच ही बँक आर्थिक अडचणीत आली. सन २०१३ पासून बँकेचे आर्थिक व्यवहार जवळ जवळ बंद पडले, कृषी कर्ज वाटपही बंद झाले, राज्यातील आत्महत्या प्रवण जिल्हयामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश असून, सन २००१ सालापासून आतापर्यंत या जिल्हयात एकूण २३३० शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
सन २०१५ मध्ये या बँकेचे पुनरुज्जीवन करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन व नाबार्ड ह्यांचे संयुक्त विद्यमाने रु.१६१ कोटी अर्थसहाय्य केले. त्याद्वारे सन २०१६ ला बँकेस RBI कडून बकिंग परवाना प्राप्त झाला. परंतू जिल्ह्यातील ठेवीदारांचा बँकेवरील विश्वास उडाल्याने बँक कर्मचारीही आत्मविश्वास हरवून बसले. परिणामी बँकेची थकित कर्ज वसूलीही प्रभावीत झाली आणि बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढणे कठीण झाले.
हिवाळी अधिवेशनादरम्यान वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडी अडचणीबाबत मा. संतोष पाटील, अपर निबंधक तथा सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांनी वर्धा येथे दि. १७/१२/२०२३ रोजी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी बँकेची सद्य:स्थिती समजून घेतली आणि बँक कर्मचा-यामध्ये खऱ्या अर्थाने आत्मविश्वास निर्माण केला, आणि बँकेचे पुनरुज्जीवन करण्याकरीता एक कालबध्द नियोजन करुन ठेव वाढीचे आणि कर्ज वसुलीचे लक्षांक देऊन बँक सक्षमीकरण अभियानाची सुरुवात केली.
दि. ९-१-२०२४ चे शासन निर्णयानुसार वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने बँकेच्या कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, वर्धा हयांचे अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय संनियंत्रण समिती गठित करण्यात आली. या समितीद्वारे बँकेचे प्रशासकीय मंडळ व बैंक कर्मचाऱ्यांच्या कामकाजचा नियमित आढावा घेऊन बँकेस येणाऱ्या अडचणी त्वरीत सोडविल्या जातात. मा. जिल्हाधिकारी, वर्धा हयांनी दि. १०-१-२०२४ ला बँकेला भेट देऊन बँकेचे मुख्यालयी १५ KV क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत केला. बँकेचे ठेवी वाढीचे दृष्टीने तसेच थकित वसुलीचे दृष्टीने त्यांनी आपल्या व्यस्त कामकाजातूनही मोलाचे सहकार्य केले आहे.
मा. संतोष पाटील, यांनी बँक सक्षमीकरण अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवीदार, कर्मचाऱ्यांच्या मोठ्या सभा घेऊन बँकेबाचतचा विश्वास जिल्हयामध्ये द्विगुणीत केला.
या सर्व मान्यवरांच्या परिश्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणून जिल्हयातील सहकारी संस्थाही बँक सक्षमीकरण अभियानात आपले योगदान देत आहेत. या माध्यमातून आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वखर्चाने ५० वर्ष जून्या असलेल्या बँकेचे आर्वी शाखा इमारतीचे अतिशय सुंदर नुतनिकरण, रंगरंगोटी करुन अतिशय मोलाचे सहकार्य केले.
- बैंक सक्षमीकरण अभियानाच्या माध्यमातून झालेल्या प्रयत्नांमुळे मागील वर्षी दि. ३१ मार्च २०२३ ला (-)९.११% असलेला CRAR दि. ३१ मार्च २०२४ ला १६.२७% इतका झाला आहे.
- (-) ९००.०६ लाख असलेले नेटवर्थ १७४८.३३ लाख इतके झालेले आहे.
- मागील वर्षी १४०२.५९ लाख असलेला नफा दि. ३१ मार्च २०२४ ला २६४२.४० लाख इतका झालेला आहे. यावरुन बँकेचे आर्थिक स्थितीत होत असलेली सुधारणा प्रकर्षाने जाणवते.
जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून ओळखली जाते. परंतु तब्बल १३ वर्षापासून कृषी कर्जवाटप बंद असल्याने जिल्हयातील सामान्य शेतकरी आर्थिक विवंचनेत होता, ही विवंचना लक्षात घेऊन प्रतिनिधीक स्वरुपात का होइना परंतू जिल्हा बँकेद्वारा यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वितरण सुरु करण्याबाबत संनियंत्रण समितीने दिलेल्या निर्देशानुसार खरीप हंगाम २०२४ मधील पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ मा.श्री. अनुप कुमार, अपर मुख्य सचिव (सहकार व पणन) मंत्रालय, मुंबई, तथा मा.श्री. दिपक तावरे, सहकार आयुक्त व निबंधक, पुणे हयांचे प्रमुख उपस्थितीत तसेच मा.श्री. राहुल कर्डिले,जिल्हाधिकारी, वर्धा हयांचे अध्यक्षतेखाली तसेच मा.श्री.शैलेश कोतमिरे, अपर निबंधक, सहकारी संस्था, पुणे,श्री. संतोष पाटील, अपर निबंधक तथा सह सचिव, मंत्रालय, मुंबई, मा.श्री.एस.बी.पाटील, अपर आयुक्त(से.नि.), मा.श्री.दिलीप दिघे, कार्यकारी संचालक, MSC बँक, मा. श्री. प्रविण वानखेडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांचे विशेष उपस्थितीत संपन्न झाला. बँकेच्या पुनरुजीवनाच्या प्रवासातील हा क्षण अतिशय महत्वाचा ठरणार याबाबत शंका नाही.
तसेच याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते बँक सक्षमीकरण अभियानाचे माध्यमातून ज्या मान्यवरांनी / संस्थांनी बँकेस विशेष सहकार्य केले त्या मान्यवरांचा आणि संस्थांचा प्रतिनिधी सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आम्हास प्राप्त झाली.
पुनःश्च समितीचे मार्गदर्शनात लवकरच वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या अडचणींवर मात करुन जिल्हयातील ठेवीदार आणि शेतकरी यांच्या सेवेत सर्वार्थाने रुजू व्हावी ही सदिच्छा.
राजेंद्र कौसडीकर
अध्यक्ष, प्राधिकृत अधिकारी समिती वर्धा जि.म.स. बैंक
तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा
संपर्क साधा
- ई-मेल :- adm@wardhadccb.in
- टेलिफोन नबंर:- 07152-240586
- पत्ता :- वर्धा रेल्वे स्टेशन समोर, वर्धा-442001